दरवर्षी कोटय़वधींचा निधी खर्ची; ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फावले

ग्रामीण आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकासकामासाठी शासनाकडून दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करूनही येथील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. त्यामुळे या भागातील नागरिक वैतागले असून, नेत्यांच्या प्रचाराला येणाऱ्या कार्यकर्त्यांना आठवण करून दिली जात आहे. दरवर्षी होणारी रस्त्यांची कामे व देखभाल दुरुस्तीच्या दर्जाची दर्जेदार संस्थेकडून तपासणी होत नसल्याने येथील ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फावले असल्याचा आरोप होत आहे.

तालुक्यात १ लाख ६० हजार एवढी लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र, या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे न झाल्याने दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. शासनाकडून ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणा आदिवासी विकास ठक्कर बाप्पा, सार्वजनिक बांधकाम विभागातील बजेटची कामे यामध्ये ३०/५४ आणि ५०/५४ तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग या विभागांकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दरवर्षी करोडो रुपये येत आहेत. मात्र, तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती गंभीर आजही जैसे थेच आहे.

जव्हार ते दाभोसा चालतवड सिल्व्हासा गुजरात रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच  पावसाळ्यात ठीकठिकाणी रस्ता वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. जव्हार ते वाडा विक्रमगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील देहेरे  मेढा रस्ता, तसेच केळीचापाडा साकुर, झाप रस्ता, तसेच जामसर सारसून, ढाढरी रस्ता हे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेडय़ापाडय़ांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र आजही जव्हार तालुक्यातील  संपूर्ण रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. दरवर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लाखोंचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामे देखील झाली आहेत. परंतु वर्षभरातच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खडय़ांच्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक वैतागले आहेत. येथील साकुर, नांदगाव, साखरशेत, जामसर अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा भार अधिक असून, यामध्ये गरोदर मातांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात पोहोचवत असताना खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा गरोदर मातांना कुटीर रुग्णालयात पोहोचवताना प्रसूती झाल्याचे प्रकार घडले आहेत.  वाहन चालक वैतागले असून, मोटारसायकल चालक खड्डय़ात पडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

आदिवासी भागातील रस्त्यांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही आजही रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. तरी याबाबत शासनाने योग्य कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.

– गोविंद भोये (नागरिक)