अशोक तुपे, श्रीरामपूर

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाल्याने नगर जिल्ह्य़ाच्या राजकारणात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सर्वपक्षीय राजकारणाला आता लगाम बसणार असून विधानसभा निवडणुकीस काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित सामोरे जातील. तरीदेखील आघाडीसमोर जागा राखण्याचे आव्हान आहे. थोरात यांना स्वत:चा नगरचा गड कायम राखावा लागणार आहे.

नगरच्या राजकारणात काँग्रेस पक्षात विखे व थोरात यांच्यात गटबाजी होती. कार्यकर्ते दोन गटांत विभागलेले होते. जिल्ह्य़ाच्या राजकारणात थोरात फारसा हस्तक्षेप करीत नसत.  विखे यांनी पक्षांतर्गत राजकारणात नेहमीच थोरात यांना धोबीपछाड दिली. थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघ वगळता अन्यत्र फारसे लक्ष घातले नाही. त्यांचा गट त्यामुळे प्रबळ नव्हता. पण नेत्यांबरोबर त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध राहिले. २०१४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसची पिछेहाट झाली. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. थोरात यांनी विखे यांच्याशी जुळवून घेतल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शालिनी विखे, तर राष्ट्रवादीच्या राजश्री घुले उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या. आता विखे भाजपमध्ये गेल्याने जिल्हा परिषद, जिल्हा बँक यांच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. त्यातून  सावरण्याची मोठी जबाबदारी ही थोरात यांच्यावर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्य मिळाले नव्हते. केवळ माजी मंत्री मधुकर पिचड यांचा प्रभाव असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात कांबळे यांना मताधिक्य मिळाले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे आव्हान थोरात यांच्यापुढे आहे. जिल्ह्य़ात बारापैकी तीन जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी विखे भाजपमध्ये गेले आहेत. कांबळे यांना विखेंविरोधामुळे निवडणुकीत कडवा संघर्ष करावा लागेल. जिल्ह्य़ात तीन जागा टिकविण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष म्हणून थोरात यांच्यापुढे आहे. थोरात यांना विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्येच गुंतवून ठेवण्याचे विखे यांचे डावपेच आहेत. थोरात यांच्याविरोधात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे किंवा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांना उभे करण्याचा गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे थोरात यांना संगमनेरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी थोरात यांचे जवळचे संबध आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील दुरावा कमी होईल. जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील. पवारांच्या दबावाला थोरात किती बळी पडतात हे जागावाटपावरून स्पष्ट होईल. थोरात यांच्या नियुक्तीमुळे दोन्ही काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

थोरात व विखे यांच्यात राजकीय संघर्ष असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची छुपी युती होती. संगमनरेची काही गावे शिर्डी मतदारसंघात तर विखेंच्या प्रभावाखालील काही गावे ही संगमनेर मतदारसंघात आहेत. दोघांच्या दोन वाटा असल्याने आता मैत्रीचे समीकरण राहते की नाही, याला महत्त्व आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांना विखे यांना शह द्यावा लागेल.

थोरात यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब साळुंके यांची नियुक्ती केली. साळुंके निष्ठावंत आहेत एवढाच निकष लावण्यात आला. ते जिल्ह्य़ात फारसे परिचित नाहीत. ते कुशल संघटक म्हणून ओळखले जात नाहीत. पण केवळ समर्थकांची वर्णी लावण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. प्रस्थापितांशी थोरात यांचे संबंध आहेत. त्यांची राजकीय अडचण होऊ  नये अशी दक्षता थोरात यांनी घेतली. मात्र असे धोरण नियुक्त्यांमध्ये घेतले तर त्याने काँग्रेस पक्ष मजबूत होणार नाही, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्य़ात सेना-भाजप व विखे यांना शह देणारा भक्कम जिल्हाध्यक्ष नेमण्यात पहिल्याच टप्प्यात थोरात यांना अपयश आले आहे.

१२ विरुद्ध शून्यचे आव्हान

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर विखे यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात १२ विरुद्ध शून्य असा निकाल लावू, असे आव्हान प्रदेशाध्यक्ष थोरातआणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिले आहे. जिल्ह्य़ातील काही नेत्यांना भाजप किंवा शिवसेनेच्या गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. हे नेते आणि आमदार आघाडीतच राहावेत यासाठी थोरात यांना प्रयत्न करावे लागतील. थोरात यांना अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात काँग्रेस आघाडीची सुरू असलेली पिछाडी रोखणे हे थोरात यांच्यापुढचे  आव्हान आहे.