पंतप्रधानांनी साधे ट्वीटही केले नाही

कराड : मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री विदर्भात जल्लोष यात्रेत रमल्याने त्यांना पूरग्रस्तांचा टाहो ऐकावयास गेला नसावा, त्यामुळेच राज्यातील पूरस्थितीबाबत सरकार निष्काळजीपणे वागले असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भीषण पूरस्थितीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असून, पूरग्रस्तांना दिलासा देणारे साधे ट्वीटही त्यांनी केले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

कराड परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या थोरात यांनी येथील पाटण कॉलनीतील पूरग्रस्त लोकांशी संवाद साधला, त्या वेळी माध्यमांशी थोरात बोलत होते. आमदार आनंदराव पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बाळासाहेब म्हणाले, की काँग्रेस आघाडी सरकारने सन २००५ च्या महापुराची परिस्थिती कमालीच्या सतर्कतेने चांगल्या प्रकारे हाताळताना पूरग्रस्तांना आर्थिक मदत देत त्या वेळच्या एकूणच अडचणींवर मात केली होती; पण तसे काम सध्या दिसून येत नाही. राज्यातील व केंद्रातील सरकारने महाराष्ट्रातील पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही. विद्यमान राज्यकर्ते केवळ मतासाठी लोकांकडे येतात.

इतर वेळी मात्र ते जनतेकडे फिरकत नसल्याचे येथील परिस्थितीवरून स्पष्ट होते. आता पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना मदत द्या, त्यांच्यावर अन्याय करू नका, पुरानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्येबरोबरच अन्य समस्यांचाही सरकारने निपटारा करावा, असे आवाहन थोरात यांनी या वेळी केले.