पाच हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; अनेक घरगुती व्यवसायही ठप्प

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे डहाणूतील फुगा व्यवसाय डबघाईला आला आहे. फुगे तयार करण्याच्या कारखान्याशिवाय फुग्यांचे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग, फुग्याचा मोल्ड, पिशव्यांवरील छपाई आदी घरगुती व्यवसाय या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र हा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यावर अबलंबून असलेल्या तब्बल ५००० कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

डहाणू तालुक्यातील मल्याण, वडकून, डहाणू गाव, सावटा, सरावली, गंजाड, डी.आय.डी.सी. अशागड या भागांत फुगे तयार करण्याचे जवळपास १०० कारखाने आहेत. यातून परिसरातील सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळतो. फुगा व्यवसायामुळे डहाणूच्या ग्रामीण भागांत अनेक जण यासबंध पूरक व्यवसायाशी जोडले गेले आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र करोना काळात फुगा कारखान्यांवर त्याचे परिणाम दिसून आल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे.

डहाणू तालुक्यातील अनुकूल हवामानामुळे या ठिकाणी फुगे तयार करण्याच्या उद्योगाने चांगला जम बसवला आहे. मात्र सरकारने डहाणू तालुक्यातील फुगा उद्योगाला लाल यादीत समाविष्ट केल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे फुगा व्यवसायाला विशेष उद्योगाचा दर्जा मिळाला तरच हा व्यवसाय पुढे टिकेल, अशी प्रतिक्रिया फुगा उद्योजक देत आहेत.

‘नवतंत्रज्ञानाला परवानगी द्यावी’

डहाणू तालुक्यात फुगा निर्मितीसाठी जुन्याच तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादन निर्मितीला मर्यादा आहेत. त्यामुळे उत्पादनतंत्रात बदल करण्यासाठी आधुनिकीकरणाला परवानगी दिली पाहिजे. तसेच चीनहून भारतात येणाऱ्या फुग्यांच्या आयातीवर बंदी आणली तरच हे व्यवसाय टिकू शकतील, असे उद्योजकांचे मत आहे. डहाणू रबर बोर्ड आणि डिप्पड गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या संस्थेने तालुक्यातील फुगा उद्योगाला हरित उद्योगात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

करोना प्रादुर्भावामुळे फुगा व्यावसायावर परिणाम झाला आहे. करोना आजाराचे सावट गेल्यानंतर हा व्यवसाय टिकण्यासाठी फुगा व्यवसायाला विशेष उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. आधुनिकीकरणासाठी सवलत दिली पाहिजे.

– विपुल गाला, सचिव, डहाणू रबर बोर्ड आणि डिप्पड गुड्स मॅन्युफॅक्चर