उर्दू शायरीमध्ये नव्या आणि जुन्याचा सुरेख संगम साधणारे शायर-कवी बशर नवाज यांचे बुधवारी रात्री औरंगाबादमध्ये निधन झाले. अत्यंत कलंदर व्यक्तिमत्त्वाच्या या प्रतिभावंताने एकाहून एक उत्तम रचना सादर करून रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले होते. ‘बाजार’ चित्रपटातील त्यांची ‘करोगे याद तो हर बात याद आएगी’, ही गजल सर्वाधिक लोकप्रिय झाली होती. त्यांनी काही काळ नगरसेवक म्हणूनही काम केले होते. १८ ऑगस्ट १९३५ रोजी बशर नवाज यांचा औरंगाबादमध्येच जन्म झाला. भारताबरोबरच परदेशातील वृत्तपत्रांतून आणि मासिकांमधून त्यांनी लेखन केले होते.
शायर निदा फाजली यांनी ‘१९६० नंतरचा देशातील उत्तुंग प्रतिभेचा कवी’ म्हणून बशर नवाज यांचा गौरव केला होता. मराठी गजल गायक भीमराव पांचाळे यांनी बशर नवाज यांची गजल मनाला तरलतेने स्पर्श करणारी आणि सहज ओठांवर गुणगुणता येणारी असल्याचे म्हटले होते.
तुझसे बिछडे तो हमने ये जाना,
कितना मुश्किल है दिल को बेहलाना
अब तो यह बशर को याद नहीं,
बन गया कोई कैसे बेगाना…
‘करोगे याद’ या त्यांच्या काव्यसंग्रहातील या काही भावस्पर्शी रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.