वाडा : वाडा, विक्रमगड या दोनही तालुक्यांत करोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे वाडा तालुक्यात आयडीयल (पोशेरी) व विक्रमगड तालुक्यात रिव्हेरा (हातणे) ही दोनही उपचार केंदांवर एकही खाट उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. अन्य तालुक्यांतील केंद्र अथवा खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करावे लागत आहे.
पोशेरी येथे समर्पित करोना आरोग्य केंद्रामध्ये (डीसीएचसी) फक्त १०० रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे. तसेच याच ठिकाणी असलेल्या काळजी केंद्रात (सीसीसी) १५० रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे. हे दोन्ही ठिकाणच्या खाटा उपलब्ध आहेत.
विक्रमगड तालुक्यातील रिव्हेरा येथे अतिदक्षता (आयसीयू) विभागात ५० खाटांची क्षमता आहे. जीवरक्षक प्रणाली ३० व अन्य करोना रुग्णांसाठी १७० असे एकूण २५० खाटांची क्षमता आहे. येथेही खाटांची उपलब्धता नाही. रिव्हेरा येथे करोनाचे जिल्हाभरातील अत्यवस्थ रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. मात्र येथे उपचारासाठी अत्यावश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना प्राणास मुकावे लागत आहे. १ ते २० एप्रिल या २० दिवसांत या उपचार केंद्रात ३४ करोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या ठिकाणी मनुष्यबळ व आरोग्य सुविधा वाढविण्याची मागणी होत आहे.
रिवेरा येथील करोना उपचार केंद्र हे पालघर जिल्ह्याातील आठ तालुक्यांसाठी जिल्हा उपचार केंद्र म्हणून पाहिले जाते, मात्र येथे नियोजनाचा अभाव असल्याने रुग्णांची फरफट होत आहे. – संदेश ढोणे, जिल्हा परिषद सदस्य
दाखल होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत आहे. अतिदक्षता विभागातील सर्वच (५०) खाटांची क्षमता पूर्ण झाली आहे. दाखल असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी येथील सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र व्यस्त आहेत. -डॉ. प्रशांत राजगुरू, नोडल अधिकारी, करोना उपचार केंद्र रिव्हेरा