खर्चाचे गणित जुळत नसल्याने परळीतील २५ सुशिक्षित मुलींचे पुढचे पाऊल..

आर्थिक गणितच जुळत नसल्याने जुळलेली लग्ने मोडण्याची वेळ दुष्काळग्रस्त भागांतील काही कुटुंबांवर आली आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी तालुक्यांतील २५ उपवर मुलींनी मात्र कुटुंबियांना धीराचा मंत्र देत दुष्काळी वर्षांत लग्नच न करण्याचे पुढचे पाऊल टाकले आहे.

बीड जिल्ह्यत चार वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आíथक अडचणीत आहेत. चालू वर्षांत शेतकरी आत्महत्यांचा आकडाही तीनशेच्या वर गेला. दोन महिन्यांपूर्वी परळी तालुक्यात तडोळी येथे मुलीचे लग्न आठ दिवसांवर असताना पशाची जमवाजमव करताना हतबल पित्याने आत्महत्या केली. लातूरमध्येही एका मुलीने हुंडय़ासाठी पसे नसल्याने आत्महत्या केली. त्यातूनच आíथक स्थिती नाजूक असलेल्या कुटुंबांतील शिकलेल्या मुलींमध्ये लग्नाच्या खर्चावरून जागृती वाढली आहे.

अशातच माजलगावपासून वीस किलोमीटर अंतरावरील दीड हजार लोकसंख्येच्या वारोळा तांडा येथेही काही दिवसांपूर्वी एका मुलीचा विवाह ठरला. मात्र, खर्चाचे गणित जुळू शकत नसल्याने लग्न मोडले. त्यामुळे मुलीचे कुटुंबीय कोलमडले होते. मात्र, मुलीनेच वडिलांना धीर देत कुटुंबालाच नव्हे, तर अख्ख्या गावाला चिंतेतून बाहेर काढले व गावातील २५ उपवर मुलींनी हा निर्णय घेतला.

तालखेड फाटय़ापासून दोन किलोमीटर अंतरावरील वारोळा तांडा या दीड हजार लोकवस्तीच्या ठिकाणी बहुतांशी अल्पभूधारक आणि ऊसतोडणी मजूर आहेत. बहुसंख्येने असलेल्या लमाण समाजात तर  हुंडय़ासह लग्नाचा खर्च दोन ते पाच लाखांपर्यंत आहे. त्यामुळे या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

दुष्काळामुळे लग्नाचा खर्च करायचा कोठून, ही चिंता आहे. अन्यत्र काही पालकांनी आत्महत्याही केल्या. या पाश्र्वभूमीवर या सुशिक्षित मुलींनी या वर्षी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

तुकाराम चव्हाण, सरपंच, वारोळा तांडा