भगवानगडावर दसरा मेळावा होणार की नाही या वादंगामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भगवानगडावरील तरुणांमध्ये आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
भगवानगडावरील दसरा आयोजनासंदर्भातील निवेदन देण्यासाठी भगवानगडावर गेलेल्याकृती समितीच्या कार्यकर्त्यांना गडामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.  शास्रींच्या समर्थकांकडून काहींना खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतरही मठाच्या बाहेर लाठ्याकाठ्या घेऊन तरुणांनी कृती समितीच्या नागरिकांना आत जाण्यास मज्जाव केल्याचे समजते.
भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे सध्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याला पंकजांनी राजकीय भाषण करु नये, यावर नामदेव शास्त्री आजही ठाम आहेत. भगवान गडाच्या कृती समितीने मात्र पंकजांना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित करुन गडाचे महंत नामदेव शास्त्रींना आव्हान दिले आहे.
भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या ट्रस्टींनी विरोध केल्यानंतर वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंकजा मुंडे गोपीनाथगडावर यंदाचा दसरा मेळावा आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सध्या दसरा मेळावा भगवानगडावरच व्हावा. यासाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.