नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्यांची हेटाळणी ‘बँक बुडवे’ अशी झाली, त्या खतगावकर-टाकळीकर गटाच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या मतदारांनी सुपूर्द केल्या. या गटाला १६ जागा देताना काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण गटाच्या पारडय़ात केवळ ५ जागा पडल्या!
सुमारे एक तपाच्या प्रशासकीय राजवटीनंतर बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. २००३-०४मध्ये बँकेचे संचालक मंडळ विविध आरोपांमुळे बरखास्त झाल्यानंतर त्या, तसेच आधीच्या काही संचालकांच्या माथ्यावर ‘बँक बुडवे’ असा शिक्का मारण्यात आला. त्यातीलच भास्करराव खतगावकर, मोहन पाटील टाकळीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बापूसाहेब गोरठेकर, हरिहरराव भोसीकर हे माजी पदाधिकारी-संचालक पुन्हा बँकेवर आले आहेत. खतगावकर गटाला (शेतकरी विकास पॅनेल) १६ जागा मिळाल्या असल्या, तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागांसह आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपला ४, तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या १६ (यात २ महिला) व इतर ५ जागांसाठी ही निवडणूक झाली. उपयुक्त पॅनेलच्या विरोधात खासदार चव्हाण यांनी किसान समृद्धी पॅनेलद्वारे २१ उमेदवार रिंगणात उतरविले होते. प्रतिस्पर्धी गटाकडून राष्ट्रवादी-भाजप व सेनेचे दिग्गज रिंगणात उतरले. चव्हाण गटाचे प्रमुख उमेदवार शिवराज पाटील होटाळकर (नायगाव), वैशाली केशवे, राजेश फुलारे, संजय अन्न्ोवार, मोहनराव धुप्पेकर आदींचा पराभव झाला.
बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची नावे : शेतकरी विकास पॅनेल – सुनील कदम, भास्करराव खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, गंगाधर राठोड, राजेश कुंटूरकर, बापूसाहेब गोरठेकर, दिनकर दहिफळे, मोहन पाटील टाकळीकर, हरिहरराव भोसीकर, दिलीप कंदकुर्ते, सुशांत चव्हाण, लक्ष्मण ठक्करवाड, गयाबाई चव्हाण, जिजाबाई जगदंबे. किसान समृद्धी पॅनेल- केशवराव इंगोले, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब कदम रावणगावकर, शंकरराव शिंदे व अन्नपूर्णा देशमुख बळेगावकर.
आमदार चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण, माजी खासदार कुंटूरकर यांचे पुत्र राजेश, माजी आमदार ठक्करवाड यांचे पुत्र लक्ष्मण आणि प्रदीर्घ काळ या बँकेचे नेतृत्व करणारे श्यामराव कदम यांचे पुत्र डॉ. सुनील यांच्यासह १६ नवे चेहरे बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाले. निकालानंतर खतगावकर यांच्या निवासस्थानी शेतकरी विकास पॅनेलच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. दुसऱ्या बाजूला खासदार चव्हाण यांच्या गोटात सन्नाटा पसरला होता. भोकर मतदारसंघातील तीनही जागा आणण्यात खासदार चव्हाण यशस्वी ठरले. मात्र, आमदार डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, हणमंतराव बेटमोगरेकर यांना आपापले उमेदवार निवडून आणता आले नाहीत. बँक कंगाल असतानाही तिच्यावर सत्ता गाजविण्यासाठी मोठी उलाढाल झाली.
दरम्यान, निवडणुकीत बँकेच्या सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतानाच आम्ही बँक बुडविली असती तर मतदारांनी स्वीकारलेच नसते, अशी प्रतिक्रिया भास्करराव खतगावकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली, तर हा विजय जनशक्तीचा असल्याचे आमदार चिखलीकर यांनी म्हटले आहे.