भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असून चौकशीसाठी हायकोर्टातील विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रीया सुरु आहे.  या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले.

भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंबेडकरवादी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संध्याकाळी हा बंद मागे घेण्यात आला असला तरी या बंदमुळे विविध शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते.  बुधवारी सकाळपासून आंदोलकांनी मुंबईतील रेल्वे मार्ग आणि रस्त्यांवर ठाण मांडल्याने मुंबईतील वाहतूक सहा तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबली होती. राज्याच्या विविध भागांमध्ये दगडफेकीच्या घटनांनी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

भीमा कोरेगावात जो हिंसाचार झाला, त्याची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी शांतता राखावी. दोन समाज समोरसमोर येणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माध्यमांनीही या प्रकरणात पहिल्या दिवशी जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा व शांतता राखण्यात सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.