गेल्या चार दिवसांत फळ बाजारातील हापूसची आवक वाढल्यामुळे पेटीमागे दर पाचशे रुपयांनी घसरले आहेत. वातावरणातील अनियमिततेमुळे पहिल्या टप्प्यातील हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात फारसा आंबाच नसल्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गुढीपाडव्यापूर्वी वाशीमध्ये पाच ते आठ डझनाच्या जेमतेम १८ ते २० हजार पेट्या जात होत्या. गुढीपाडव्याला मुहूर्ताच्या दिवशी सर्वाधिक, ३४ हजार पेट्या गेल्या. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होती. एप्रिल महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून सरासरी ६० हजार पेटी जाते. त्या तुलनेत आवक कमी झाल्याने पाच डझनच्या पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे तो पिकण्याच्या प्रक्रियेचाही वेग वाढला आहे. वाढलेली आवक आणि संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाचाही परिणाम दरावर झालेला आहे. आठ दिवसांत पाचशे रुपयांनी दर खाली आले आहेत.
प्रसिद्ध बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले की, सध्या घाऊक बाजारपेठेत सुमारे ३० ते ३४ हजार पेट्या जात असून फळाच्या वजनानुसार पेटीचा दर २ ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. या महिनाअखेरपर्यंत त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. पण पुढील महिन्यात तो आणखी थोडा कमी होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, गल्फ, युरोप खंडात गेल्या महिन्यात सुमारे २० टक्के आंबा जात होता. त्यात आता १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र विमानाने वाहतूक करताना निर्यातदारांना दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. तसेच करोनामुळे यंदा अमेरिकेतील निरीक्षक खरेदीपूर्व तपासणीसाठी येऊ न शकल्याने त्या देशात निर्यात होऊ शकणार नाही.