जिल्ह्य़ात आता विविध राजकीय पक्ष उमेदवारांनी आता आपापला मोर्चा त्या त्या विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार कसे कमी करता येतील, याकडे वळवला असून यासाठी साम, दाम, दंड, भेद, अशा न्यायाचा वापर सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
सर्वच विधानसभा मतदारसंघात बहुकोणीय सामना राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून मतांची विभागणी कमी व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्ष उमेदवार ज्या, ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले त्यांची मनधरणी करीत आहेत. भाजप, सेना, कांॅग्रेस, राष्ट्रवादी व इतर लहान-मोठय़ा राजकीय पक्षांव्यतिरिक्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचाही मोठा भरणा दिसून येत आहे. या उमेदवारांचे समर्थन मिळविण्यासाठी  उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून त्यांच्या घरापयर्ंत पोहोचून उमेदवारी मागे घेतल्यास भविष्यात त्यांना कसा लाभ मिळू शकतो, याची समीकरणे, तर डमी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांचेही अर्ज परत घेण्यासाठी एबी फार्म मिळालेल्या उमेदवाराच्या नाकीनऊ येत आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव, आमगाव-देवरी, गोंदिया व तिरोडा या चार विधानसभा मतदारसंघातून कालपर्यंत एकूण १३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात राजकीय पक्षाचे अंदाजे ३० ते ३५ उमेदवार असून इतर १०० अर्ज अपक्ष उमेदवारांचे आहेत.
अनेक अपक्षांना प्रमुख पक्ष उमेदवारांना समर्थन जाहीर करण्यासाठी पशाची लालूचही दिली जात असल्याची माहिती एका अपक्ष उमेदवाराने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. ३० व १ ऑक्टोबरला उमेदवारांना अर्ज परत घेता येणार असल्याने कुठल्या अपक्ष उमेदवारांमुळे आपली मते कापली जाऊ शकतात, याचा आराखडा बांधून ते उमेदवार निवडणुकीतून माघार कसे घेतील, यावर राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.