रुग्णांच्या लुटीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पालघर: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० खाजगी रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिसूचित करण्यात आले असून अशा रुग्णालयांनी शासकीय नियमावलीनुसार बिल आकारणी करावी अशी सूचना पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयांना करोना रुग्णांना सेवा सुविधा देण्यासाठी परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने बिल आकारणीसंदर्भात शासनाचे आदेश व नियमांची प्रत देण्यात आली होती. त्याचबरोबर बिलाची आकारणी कशी करण्यात यावी याबाबत शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पत्र देखील देण्यात आले होते. असे असताना अवास्तव बिलाची आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या तसेच लोकसत्तामध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पुन्हा नव्याने पत्र काढून विविध करोना रुग्णालयांकडून होत असलेल्या आकारणीची माहिती व पूर्वकल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी तसेच आकारणी करत असलेले दर फलक रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात दर्शनीय भागात ठळकपणे लावण्यात यावे असे देखील जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. अवास्तव बिलाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीची तपासणी विशेष पथकाकडून करण्यात येणार असून त्यामध्ये आवाजवी आकारणी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित खाजगी करोना रुग्णालयांना पत्राद्वारे सूचित केले आहे.
ल्लअवास्तव बिलाची आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या तसेच लोकसत्तामध्ये या संदर्भात दिनांक २१ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. रुग्णांच्या नातलगांकडून रुग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचे उघड झाले होते.