भारतीय कृषी संशोधन परिषदेच्यावतीने (आयसीएआर) घेतलेल्या जेआरएफच्या परीक्षेत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान विषयातील विद्यार्थी महेशकुमार समोता देशात दुसरा, तर महाराष्ट्रातून प्रथम आला असून इतर राष्ट्रीय संस्थांमध्येही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी लक्षवेधक ठरली आहे. एवढेच नव्हे, तर तीन ते पाच हा गुणानुक्रमातील (रँक) सातत्य कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवले आहे.
राज्यात शासकीय अनुदानित कृषी महाविद्यालयांतून ४५०० विद्यार्थी दरवर्षी बी.एस्सी.चे (कृषी) शिक्षण घेतात, तर खाजगी कृषी महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या १० हजार आहे. यातील काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असले तरी हजारो विद्यार्थी दरवर्षी बी.एस्सी. होतात. देशात एकूण ४४ कृषी विद्यापीठे आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी बीएस्सी होतात. आयसीएआरच्यावतीने प्रत्येक विद्यापीठातील एम.एस्सी.साठी १० टक्के कोटा राखीव असतो. यातून प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी (जेआरएफ) प्रयत्न करीत असतात. प्रत्येक विद्यापीठातील आठ-नऊ विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाते. त्याप्रमाणे अकोला कृषी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांना विद्यावेतन तर मिळालेच शिवाय, चांगला गुणानुक्रम मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे एम.एस्सी.साठीचे प्रवेशही निश्चित झाले आहेत. आयसीएआरने एप्रिल-२०१४ मध्ये घेतलेल्या परीक्षेत अकोला विद्यापीठाचे एकूण ७९ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील आठ विद्यार्थ्यांना जेआरएफ मिळणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना त्या त्या राज्याची केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) देण्याची गरज पडणार नाही. याशिवाय, कृषी विद्यापीठाच्या नम्रिता शर्मा या विद्यार्थिनीची गुजरातमधील आनंद येथील इन्स्टिटय़ुट ऑफ रुरल मॅनेजमेंट (आयआरएमए) आणि प्रतिमा भारती हिची अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेत प्रवेश निश्चित झाला आहे. कृषी विद्यापीठाच्या २३ विद्यार्थ्यांनी १०० च्या आत गुणांकन (रँक) मिळवले आहे.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयाची विनू दुबे ही देशातून तिसऱ्या क्रमांकावर आहे, सामाजिक विज्ञान विषयाचा अमित तुमडाम (४), वनस्पती विज्ञान विषयाचा सहादेव कुवराद्रा (५) आणि शेखरकुमार (५), जैवतंत्रज्ञानचा अशोककुमार (८), कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा गुलाब पाठक (९) आणि वनस्पती विज्ञानचा विवेकुमार झरिया (११) अशा आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख १० हजारांपर्यंत विद्यावेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असले तरी पदव्युत्तर शिक्षण घेण्यात अकोला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विशेष रस असतो. इतर कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा नागरी सेवांमध्ये जाण्याचा ओढा असतो, असे नागपूरच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वीरेंद्र गोंगे म्हणाले.