21 January 2021

News Flash

निकृष्ट धान्याचे ‘रेशनिंग’

शिधावाटप दुकानातील धान्यात पक्षांची विष्ठा

शिधावाटप दुकानातील धान्यात पक्षांची विष्ठा

विरार : टाळेबंदीत गरीब गरजू नागरिकांना उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून शासनाने शिधावाटप दुकानावर स्वस्तात धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र नालासोपारा पूर्वेत चक्क शिधावाटप दुकानावर निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केले जात असल्याचा प्रकार सामोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करत आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज परिसरातील पोस्ट ऑफिसजवळ अंजली बचत गटाच्या  शिधावाटप दुकानातून गहू, तांदूळ स्वस्त दरात वाटप केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शिधावाटप दुकानावर खराब धान्यवाटप केले जात आहे. या धान्यातून पक्ष्याची विष्ठा व कचरा दिला जात आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्यवाटप केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच, हे धान्य आरोग्यासाठी धोकादायक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे धान्यपुरवठा करून नागरिकांची क्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांनी केला आहे.

शिधावाटप दुकानातून घेतलेल्या धान्यात खूपच कचरा आढळून आला आहे. पक्ष्यांची विष्ठा व कचरायुक्त घाणेरडे धान्य मला वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे हे धान्य खावे की नाही असा मला प्रश्न पडला आहे.

– एबिलीन परेरा, ग्राहक

निकृष्ट खाद्यपदार्थाची विक्री

विरार / भाईंदर :  अत्यावश्यक सेवेतील वस्तूची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने आधीच अनेक ठिकाणी वस्तू चढय़ा भावाने विक्री केली जात असताना आता बाजारात निकृष्ट दर्जाचा माल विक्री केला जात आल्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. यात मोठय़ा प्रमाणात अंडी, ब्रेड, बटर, चीज आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्या धोका निर्माण झालेला आहे.

विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात राहणाऱ्या राजू पाठक यांनी याच परिसरातील लक्ष्मी एका दुकानातून ब्रेडचे पाकीट घेतले होते. या ब्रेडच्या पाकीटवर १० एप्रिल २०२० ही मुदत दिनांक छापील होती. पाठक यांनी हे पाकीट उघडले असता; ब्रेडला बुरशी लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी दुकानदाराशी संपर्क साधून माहिती दिली असता त्याने वितरकाशी संपर्क साधण्यास सांगितले. नामांकित कंपन्यांचे ब्रेड उपलब्ध नसल्याने स्थानिक बेकरीतून ब्रेड आणून विकले जात असल्याचे वितरकाने सांगितले.  तर भाईंदरमध्ये काशीनगर परिसरात राहणाऱ्या विनोद कदम यांनी याच परिसरातील एका दुकानातून ११ अंडी घेतली होती. पण घरी आल्यावर ती अंडी उकडल्यावर असता ती खराब असल्याचे आढळून आले. त्यांनी या संदर्भात दुकानदाराला माहिती दिली असता त्यांनी वितरकाकडे बोट दाखवत हात वर केले. या दुकानात अंडी देणारा परिसरातील शेकडो दुकानात माल वितरित करत आहे. कदम यांनी याची माहिती घेतली असता इतरही ग्राहकांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या असल्याचे त्यांना समजले.

या संदर्भात शिधावाटप दुकानावर जाऊन तात्काळ माहिती घेत आहोत. अशा प्रकारे जर निकृष्ट दर्जाचे धान्यवाटप केले जात असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– किरण सुरवसे,  तहसीलदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:39 am

Web Title: bird shit in grain of ration shops in virar zws 70
Next Stories
1 सोलापूरमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलीसांवर दगडफेक
2 सोलापुरात एकाच दिवशी दहा करोनाबाधित
3 ‘कोविड- १९’वर लस बनविण्यास ‘आयसेरा बायोलॉजिकल’ला संमती
Just Now!
X