युतीबाबत आपण आशावादी असून भाजपा आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचं वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आम्हाला अहंकार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

“शिवसेनेसाठी आधीही दारं उघडी होती आणि पुढेही राहतील. शिवसेना आणि भाजपा नैसर्गिक मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपाचं रक्त हिंदुत्त्वाचं असून युतीबाबत आपण आशावादी आहोत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली असून दोघेही पक्ष सोडणार नाहीत असं सांगितलं.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु असून यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दोघेही पक्ष सोडणार नाहीत असं स्पष्ट केलं. “पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपाचेच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण असून मी जात आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.