News Flash

जनहितासाठी पाठिंबा, पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या; ठाकरे सरकारला भाजपाचा सवाल

"रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार, कमाईची व्यवस्था?"

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने रविवारी कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपाने पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करतानाच ‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’ असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत.

महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करताना काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. उपाध्ये यांनी ट्वीट करून राज्यातील वेगवेगळ्या घटकांबद्दल आणि उपाययोजनांविषयी सरकारला उत्तर मागितले आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण; ५०० मृत्यू

काय म्हणाले केशव उपाध्ये?

“जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी दया… कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार? रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था? या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का? रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?,”असे प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- Break The Chain : महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली

लॉकडाउन सदृश्य निर्बंध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा, तर इतर वेळेत जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनकरण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांवरील भाजपा, मनसेसह विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 10:51 am

Web Title: bjp chief spokesperson keshav upadhye raised questions about handling of covid situation bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “….ही मागणी ताबडतोबत मान्य करावी,” आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती
2 Video : कोविडमुळे मृत्यू, महिलेच्या नातेवाईकांनी रिसेप्शन काऊंटर दिलं पेटवून
3 कडक निर्बंध लावण्यात आलेल्या महाराष्ट्रात येणार केंद्रीय पथक; पंतप्रधान कार्यालयाची माहिती
Just Now!
X