राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.

विश्वास पाठक यांनी या संदर्भातील प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून, त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे. भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे. सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना, तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे, असेही पाठक यांनी म्हटले आहे.

भाजपाकडून देण्यात आलेली आकेडवारी –
सिंधुदुर्ग 70 पैकी 45, रत्नागिरी 479 पैकी 59, रायगड 88 पैकी 33,ठाणे ग्रामीण 151 पैकी 105, पालघर 3 पैकी एकही नाही, नंदुरबार 87 पैकी 27, धुळे 218 पैकी 117, नाशिक 621 पैकी 168,जळगाव 783 पैकी 372, अहमदनगर 767 पैकी 380, बुलढाणा 527 पैकी 249,अकोला 222 पैकी 123, वाशिम 163 पैकी 83, अमरावती 553 पैकी191, यवतमाळ 980 पैकी 419, वर्धा 50 पैकी 28, नागपूर 130 पैकी 73,भंडारा 148 पैकी 91, गोंदिया 189 पैकी 106, गडचिरोली 368 पैकी अद्याप आकडेवारी नाही, चंद्रपूर 629 पैकी 344, नांदेड 1015 पैकी 442, परभणी 566 पैकी 229, हिंगोली 495 पैकी 191, जालना 475 पैकी 253, औरंगाबाद 618 पैकी 208, बीड 129 पैकी 67, लातूर 383 पैकी 211, उस्मानाबाद 428 पैकी 180, पुणे 748 पैकी 200, सोलापूर 658 पैकी 204, सातारा 879 पैकी 337, कोल्हापूर 433 पैकी 189, सांगली 152 पैकी 57 अशाप्रकारे एकूण 14 हजार 202 पैकी 5 हजार 781 ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आलेला आहे.