हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही, तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारमध्ये कोणतेही मतभेद, कुरघोडी किंवा अंतर्विरोध नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे. “आता आयसीएमआरने लक्षणं असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितलं आहे. चाचण्यांचे अहवाल २४ तासात कसे येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणं असलेल्या रूग्णांच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो,” असं देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे. खासगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“नाशिक सध्या चिंताजनक टप्प्यात आहे. थोडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन काम करते आहे. पण, ते काम प्रत्यक्ष जमिनीवर पण दिसलं पाहिजे,” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. “काल मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ ३३०० चाचण्या झाल्या.अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा- Coronavirus: मुंबईत ९८४ जणांची प्रकृती गंभीर, कॉल सेंटरला दीड लाखांपेक्षा जास्त फोन

आणखी वाचा- … तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे धंदे सुरूच : शिवसेना

“जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्याप्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्या. केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी कोरोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.