राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर असून वसमत येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडत सरकारने तात्काळ मदत करावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू नये, सरकारने बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

“मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करा ना. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.