मातब्बर नेते गळाला लागल्याने विजयाची आशा

संतोष मासोळे, लोकसत्ता

धुळे : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणारी यंदाची जिल्हा परिषद निवडणूक भाजपची परीक्षा पाहणारी आहे. शिरपूर तालुक्यात जागावाटपावरून आघाडीत बिनसले असताना भाजपने चार गट, एका गणातली जागा बिनविरोध राखत आपणही स्पर्धेत असल्याचे दाखविले आहे.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात २००४ चा अपवाद वगळता शिवसेना-भाजपला काँग्रेसने सत्तेपासून दूरच ठेवले आहे. ज्या नेत्यांच्या प्रभावाखाली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होत असे, त्यातील बहुतांश भाजपवासी झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला निकराचे प्रयत्न करावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि चार तालुक्यांच्या पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी ७ तारखेला मतदान होत आहे. त्यापैकी चार गट आणि तीन गण बिनविरोध झाल्याने आता ५१ गट आणि १०९ गणांमध्ये निवडणूक होईल.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची की स्वबळावर, यावर फारसा खल न करता तीनही पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणशिंग फुंकले. शिरपूर तालुक्यात जागावाटपात एकमत झाले नाही. यामुळे हा तालुका वगळता इतरत्र भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत माजी मंत्री अमरीशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे आणि शिवाजी दहिते हे तीन नेते भाजपमध्ये गेले. त्यांच्या प्रभावाचा पुरेपूर लाभ उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील आणि अमरीशभाई पटेल हे दोन्ही काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचे दोन गट परस्परविरोधी भूमिका घेत राजकारणात सक्रिय राहिले. जिल्हा परिषदेवर पूर्वी पाटील यांचा, तर अलीकडे पटेल यांचा प्रभाव राहिला. मात्र पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेस राजकारण करीत आहे. अमरीश पटेलांनी शिरपूर तालुक्यातील जागा बिनविरोध निवडून आणत आपला प्रभाव आजही कायम असल्याचे अधोरेखित केले. रोहिदास पाटील यांचे एके काळचे कट्टर समर्थक सुभाष देवरे यांनीही त्यांच्या स्नुषा धरती देवरे यांना लामकानी गटातून बिनविरोध निवडून आणत भाजपच्या जागा वाढविण्याचे मनसुबे दाखवले.

काँग्रेस कमकुवत

जिल्हा परिषदेवर आधिक्याने काँग्रेसची सत्ता राहिली आहे. शिरपूर, धुळे आणि साक्री या तालुक्यांतून काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य विजयी होत आले आहेत. अमरीशभाई आणि दहिते यांच्या प्रवेशामुळे शिरपूर तालुक्यात काँग्रेसचे बळ कमी झाल्याचे चित्र आहे. शिंदखेडा तालुक्यात भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांनी रावल यांना चांगलीच टक्कर दिली होती. यामुळे महाविकास आघाडी या तालुक्यात आपला प्रभाव वाढवू शकेल. बहुतांश गट, गणांत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होईल.