नगर : सनातन संस्थेच्या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करून पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा कुटील डाव भाजपने आखला असून हा डाव मतदारांनी उधळून लावावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काल, मंगळारी रात्री पाथर्डी येथील सभेत केले.

काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रवक्ते सचिन सावंत, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. जयकुमार गोरे, जि. प.अध्यक्ष शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, शोभा बच्छाव, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, मोहन पालवे, काशिनाथ लवांडे, अजय रक्ताटे, बंडू बोरु डे, प्रतीक खेडकर आदी उपस्थित होते.

नगर दक्षिण मतदारसंघातून सलग तीनवेळा भाजपचा खासदार निवडून आल्याने दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला घेऊन मला उमेदवारी दिल्यास हा मतदारसंघ आपण जिंकून दाखवू असे साकडे डॉ. सुजय विखे यांनी चव्हाण यांना घातले. त्यावर चव्हाण यांनी, राज्याच्या राजकारणात स्व. शंकरराव चव्हाण व स्व. बाळासाहेब विखे ही जोडी राम लक्ष्मणाची जोडी म्हणून सर्वपरिचित होती. विखे यांच्या घरातील तरु ण मुलगा पुन्हा खासदार होणार असेल तर मला आनंद होईल. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी मी राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावू. तुम्ही चिंता करू नका. येणारा काळ हा काँग्रेसचा आहे. अच्छे दिनची घोषणा देत सत्तेवर आलेल्या या शासनाने जनतेला बुरे दिन दाखवले. केंद्र व राज्य सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शेतमालाला भाव नाही, लोक रस्त्यावर दूध फेकून देऊ लागले आहे. एकोणीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वेळीच कोळसा खरेदी न केल्याने रोज नऊ तास लोडशेडिंग करण्याची वेळ शासनावर आली. निवडणुका तोंडावर आल्याने त्यांना म. गांधीची आठवण आली मात्र आरएसएसचा गांधींशी काय संबंध आहे ते जनतेला ठाऊक आहे. गांधींचा फक्त चष्मा वापरण्याचे काम हे करत आहेत. जनतेला वेठीस धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या दर्शनाला पांडुरंगाने सुध्दा येऊन दिले नाही. ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार हे पंचांग पाहून त्यांनी ठरवले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.