शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आता भाजप पक्षविस्ताराच्या कामासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. देशभरात सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप या संकल्पासह ६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत नवीन सदस्य नोंदणीसाठी मोहीम राबवण्यात येणार असून महाराष्ट्रातील ९५ हजार ४०० बूथवर प्रत्येकी ५० अशा रितीने भाजपचे ५० लाख नवीन सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सदस्यता नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभेच्या विजयावर समाधान मानून स्वस्थ न बसता भाजपच्या सर्वोच्च कामगिरीसाठी पुन्हा संघटना बांधणीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हाती घेतले आहे. बंगाल, ओदिशा, तेलंगणा, केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचे सरकार येईल आणि काश्मीर खोऱ्यातही पक्षाला यश मिळेल ती पक्षाची सर्वोच्च कामगिरी असेल, असे प्रतिपादन चौहान यांनी केले. आमदार रामदास आंबटकर आणि संजय उपाध्याय, पक्षप्रवक्ते केशव उपाध्य यावेळी उपस्थित होते.

देशभरात भाजपचे ११ कोटी तर महाराष्ट्रात एक कोटी सदस्य आहेत. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदस्यता नोंदणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ९५ हजार ४०० बूथ आहेत. प्रत्येक बूथवर ५० नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठरवण्यात आले असून त्यामुळे राज्यात भाजपचे ५० लाख नवीन सदस्य होतील. चार ते पाच बूथ मिळून एक अशा रीतीने राज्यात २० हजार शक्तीकेंद्रे आहेत. या शक्तीकेंद्रातील विस्तारकांना ६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत केवळ नवीन सदस्य नोंदणीचे काम करण्यास सांगण्यात येणार आहे, असे चौहान यांनी सांगितले. या सदस्य नोंदणीत त्या भागातील सर्व समाजातील, सर्व वर्गातील लोकांना भाजपशी जोडले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी हे ‘रणछोड’

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची अवस्था बुडणाऱ्या जहाजासारखी झाली आहे. एरवी जहाजाचा कप्तान हा अखेपर्यंत जहाज वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र पराभवानंतर पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी हे तर रणछोड आहेत, असा टोला शिवराजसिंह चौहान यांनी लगावला.

कमलनाथ सरकार कोसळणार

मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये आताच कुरबुरी सुरू झाल्या असून लोकांमध्येही असंतोष निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये पैशांची मोठी देवाणघेवाण होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सहा महिन्यांतच लोकांच्या मनातून उतरलेले कमलनाथ सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे वाटत नाही. ते कोसळेल, असे भाकीतही शिवराज यांनी केले. भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबाबत विचारता, त्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला.