नेतृत्व करण्यास एकही लायक नेता नसल्याची जिल्हा युवा अध्यक्षांची टीका

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

लोकसभा, विधानसभेत चांगले यश, जिल्हा परिषदेपाठोपाठ महानगरपालिका जिंकल्याने सांगली जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असतानाच पक्षातील खदखद समोर येऊ लागली आहे. खासदार संजयकाका पाटील यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानेच बहुधा युवा भाजपचे अध्यक्ष गोपीचंद पडाळकर यांनी खासदारांवर तोफ डागल्याची पक्षात चर्चा आहे. या टीकेच्या पाश्र्वभूमीवर पक्षाने काही दखल घेतलेली नसली तरी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात सारे काही आलबेल नाही, असा संदेश गेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचे राजकारण हे चाणक्य नीतीच्या पलिकडेचे मानले जाते. इथे पक्षात राहूनही पक्षाविरुद्ध  घेतलेली भूमिका सोयीस्करपणे जनतेने विसरावी, अशी अपेक्षा ठेवून कार्यरत राहता येते. कधी काळी जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे राजकारण सांगलीतून ठरविले जात होते, केले जात होते. यामुळेच काँग्रेसच्या भरभराटीच्या काळात वसंतदादांनी राज्याचे नेतृत्व करीत असतानाही दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारली. केवळ काँग्रेसचेच नव्हे तर जनता पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राजारामबापू पाटील यांनी समर्थपणे सांभाळली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानल्या जात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ५८ विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित सदस्यांबाबत आणि राज्य शासनावर असलेल्या नाराजीतून काही जागा गमवाव्या लागल्या तरी त्याचा फटका बसला तरी गोळाबेरीज बहुमतापर्यंत पोहोचावी ही भूमिका आहे. यातच बदलत्या परिस्थितीचा अंदाज आल्याने शिवसेनेशी युती करण्याची भाजपची मानसिकता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साखर कारखानदारी असो वा आर्थिक नाडय़ा असलेल्या जिल्हा बँकांवर भाजपला अद्याप वर्चस्व मिळवता आले नसले तरी सत्तेमध्ये शिरकाव करण्यात भाजप यशस्वी झाला, हे मान्यच करावे लागेल. भाजपचा जनाधार या भागात वेगाने झाला आहे. पक्ष विस्तार करीत असताना भाजपच्या नेतृत्वाने काहीना काही आमिष दाखवून बहुसंख्य लोकांच्या हाती कमळाचे फूल दिले. आता तर आयात नेत्यांचीच एवढी गर्दी झाली आहे की, मूळचे भाजप नेते या गर्दीमध्ये अंग चोरून बसत आहेत. हा काळाचा महिमाच म्हणावा लागेल. सामान्य लोकांना ‘अच्छे दिन’ आले की नाही हा एकवेळ राजकीय वादाचा विषय असला तरी भाजपमध्ये आलेल्यांना ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षा पक्षात आलेल्यांना पदे तरी कुठली देणार, हा प्रश्नच आहे.

आटपाडीसारख्या दुष्काळी भागातील गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते. निवडणूक प्रचारावेळी त्यांच्या वक्तृत्वाचा फायदा भाजपने करून घेतला. स्टार प्रचारक म्हणून त्यांची गणती केली गेली. राज्यभर तरुणवर्गाला आकर्षति करण्यासाठी पडळकर यांचा वापर करून घेण्यात आला. लोकसभेच्या मदानात काँग्रेसच्या पराभवासाठी धनगर समाजातील एक उमदे नेतृत्व म्हणून त्यांना पुढे आणण्यात आले. या बदल्यात खानापूर-आटपाडी विधानसभेसाठी मदानातही उतरविले. खानापूर मतदारसंघामध्ये तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलातील काही गावांचा समावेश आहे. शिवसेनेचे अनिल बाबर, पडळकर आणि काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांच्या तिरंगी लढतीत खासदार गटाने तासगाव तालुक्यातील आपली ताकद सदाभाऊंच्या पारडय़ात टाकली. तरीसुद्धा पडळकर आजपर्यंत भाजपमध्ये राहून आवाज न काढता एखादे महामंडळ तरी पदरात पडेल या आशेवर होते. तथापि, महामंडळाची गाडी तर दूरच मात्र, खासदारांनी याला खो घातल्याची त्यांची भावना झाली. यातून हा संघर्ष वाढत गेला.

अखेर गेल्या आठवडय़ात या वादाला तोंड फुटले. जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची लायकी आजघडीला एकाही भाजपच्या नेत्यामध्ये नसल्याची टीका करीत पडळकर यांनी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण केली. एवढेच नाही तर भाजपला एवढी ताकद जिल्ह्यात मिळाली असतानाही मिरजेचे आमदार सुरेश खाडे आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मंत्रिपदाला खासदारांचाच अडसर असल्याचे सांगून राळ उडवली आहे. अर्थातच पडळकर यांचे होत असलेले आरोप हे दखलपात्र नसल्याचे सांगत खासदारांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली असली तरी खाडे यांनी मात्र, माझ्या मंत्रिपदाबाबत नेमके काय झाले हे कळण्याची गरज व्यक्त केली आहे. नाईकांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नसली तरी, आतापर्यंत इस्लामपूरचा अडथळा असल्याचा त्यांचा समज होता. वरिष्ठ पातळीवर नागपूरच्या गडकरी-फडणवीसांमधील वाद आपल्या मंत्रिपदाच्या आड असल्याचा त्यांचा ग्रह होता. तो परस्पर दूर करण्याचे श्रेय अर्थातच पडळकरांनी घेतले.

पडळकरांनी खासदारांवर टीका करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद आणि त्याला कॅबिनेट दर्जा हे निमित्त ठरले. काकांना दिल्लीची हवा मानवत नाही.

यामुळेच त्यांच्या जास्तीत जास्त वाऱ्या या मुंबईच्या वर्षांवर असतात. मात्र, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली मत्री गडकरी वाडय़ावर कळणार नाही याची खबरदारी घेत त्यांनी ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांना निधी देण्याचा विषय असो वा कवठेमहांकाळला ड्रायपोर्ट उभारण्याचा विषय असो, समन्वय साधत जिल्ह्यात माझ्याविना सध्या तरी पर्याय सापडणार नाही, अशी स्थिती निर्माण करण्यात यश मिळविले आहे. एकीकडे संजयकाकांचा मुख्यमंत्र्यांकडे असलेला दबदबा आणि दुसरीकडे गडकरी वाडय़ावरची वर्दळ कोल्हापूरच्या पाटीलवाडय़ावर न रुचणारी ठरली नसती तर नवल. यातूनच पडळकरांच्या आरोपाला बळकटी मिळाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण लोकसभेचे पडघम वाजत असताना पडळकरांनी सोडलेला तोफगोळा सहजासहजी सोडलेला नसणार याची निष्ठावंत गटालाही खात्री वाटत आहे.

लोकसभेसाठी रंगीत तालीम

लोकसभेसाठी विद्यमान खासदारच उमेदवार असतील असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकीकडे जाहीर केले आहे. यामुळे मुंबईला येण्याचे दोर कापण्यात येत असल्याचे सूचित केले असले तरी दसऱ्यानंतर गडकरी, फडणवीस यांना घेऊन कवठेमहांकाळला मोठा मेळावा घेण्यासाठी खासदार सध्या प्रयत्नशील आहेत. याचदरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आरेवाडीच्या बनात पडळकर यांनी धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करून शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्या घडामोडीवरून उद्या लोकसभेसाठी पडळकर मदानात आले तर आश्चर्य वाटणार नाही.