करोना रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे मंगळवारी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्यासह मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर अशा चार महापालिका आयुक्तांची एकाच दिवशी बदली झाली. गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील एकूण ११ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई झाली. तर एकूण २२ अधिकाऱ्यांना त्यामुळे नियुक्तीच्या चक्रात जावे लागले. डॉ. विपीन शर्मा यांच्यावर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील अन्य प्रश्नांवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“उच्च शिक्षण मंत्री महोदय, हा पहा तुमच्या निर्णयानंतरचा सावळागोंधळ! अजून सूत्र ठरले नाही, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा अद्याप निर्णय नाही आणि गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडे लेखी मागायला सुरुवात केली. जेमतेम आठ दिवसात लेखी देण्याची सक्ती? विद्यार्थ्यांचा छळ सुरु,” असं शेलार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर टीका केली. शेतकरी हवालदिल, विद्यार्थी अधांतरी, रोजच्या रोज नवी अदलाबदली, आधी घोषणा..मग निर्णय…मग गृहपाठ… इथंच सगळी मेख, ११ विद्यापीठांच कसं ठरणार सूत्र एक? आता हाच एक सगळ्यात मोठा पेच!, तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार…लय भारी!,” असं म्हणत शेलार यांनी सरकारला टोला हाणला.

आणखी वाचा- सलून पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्या, चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

३ महिन्यात ३६ बदल्या

मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांत एकूण ३६ सनदी अधिकारी-महापालिका आयुक्तांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. राज्य सरकारने १९ मार्च ते २५ मे या कालावधीत २१ अधिकाऱ्यांची बदली केली. ८ जूनला तीन जणांची बदली झाली. ९ जूनला दोघांची, २० जूनला तिघांची, २३ जूनला चौघांची बदली झाली. याशिवाय भिवंडी निजामपूरचे पालिका आयुक्त आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांच्या स्वतंत्र बदल्या झाल्या. अशारितीने एकूण ३४ सनदी अधिकारी-महापालिका आयुक्तांची बदली-नियुक्ती झाली. या प्रशासकीय बदल्यांमध्ये काही राजकीय हिशेबही चुकते होत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आता कोणाचा क्रमांक, अशी चर्चा सुरू झाली आहे.

करोना नियंत्रणात अपयशी ठरल्यामुळे बदलीची सुरुवात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्यापासून झाली. त्यांच्यासह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, जयश्री भोज यांचीही मुंबई महापालिकेतून बदली झाली होती. त्यानंतर सोलापूरचे आयुक्त दीपक तावरे, जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पनवलेचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना करोना नियंत्रित करता न आल्याने पदावरून दूर व्हावे लागले. गेल्या तीन महिन्यांत एकूण ११ प्रशासकीय अधिकाऱ्यांना करोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा फटका बसला आहे.