03 March 2021

News Flash

वालचंद अभियांत्रिकीत भाजप नेत्याची गुंडगिरी? महाविद्यालयांत गुंडांचा गोंधळ

सांगली भाजप जिल्हाध्यक्षांच्या कार्यकर्त्यांने गोंधळ घातल्याचा व्यवस्थापनाचा आरोप

सांगली भाजप जिल्हाध्यक्षांच्या कार्यकर्त्यांने गोंधळ घातल्याचा व्यवस्थापनाचा आरोप
‘आम्ही म्हणू तोच संचालक हवा,’ असा हेका धरून भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गुंडांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयांत गोंधळ घातल्याचा आरोप महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे. देशमुख यांचे कार्यकर्ते एस. जी. कानिटकर यांनी संचालकांच्या कक्षात बळजबरीने घुसून त्यांचा कक्ष ताब्यात घेतल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावरून ‘वालचंद मेमोरिअल ट्रस्ट’ आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये वाद सुरू आहे. ट्रस्टच्या व्यवस्थापन परिषदेने महाविद्यालयाच्या संचालकपदी डॉ. जी. व्ही. परिशवाड यांची नेमणूक केली आहे. देशमुख यांचे कार्यकर्ते कानिटकर यांनी डॉ. परिशवाड यांच्या कक्षात घुसून संचालक पदावर एम. जी. देवमाने यांची नियुक्ती करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे.
कानिटकर हे गुंडांसमवेत मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे घुसले. संचालकांच्या कक्षात जाऊन त्यांनी संचालकांच्या हातातील किल्ल्या हिसकावून घेतल्या आणि त्यांना कक्षाबाहेर हाकलून दिले आणि देवमाने हे संस्थेचे संचालक असल्याचे कानिटकर यांनी जाहीर केले. त्याच वेळी उपसंचालक डॉ. पी. जे. कुलकर्णी यांच्याकडील जाबाबदारीही त्यांनी देवमाने यांच्याकडे द्यावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला. महाविद्यालयाच्या आवारात कानिटकर यांनी आपले शेकडो गुंड उभे केले होते. ‘पृथ्वीराज देशमुख हे महाविद्यालयात येणार असून त्यापूर्वी तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर परिणामांना सामोरे जा,’ अशी धमकी या वेळी संचालकांना देण्यात आली, असे संस्थेने कळवले आहे.
संस्थेला हा त्रास वारंवार होत असून यापूर्वी २९ जानेवारीलाही देशमुख, कानिटकर गुंडांना घेऊन महाविद्यालयांत आले होते. महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या जागी त्यांनी आपले गुंड उभे केले. महाविद्यालयाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाकडे आम्ही अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानंतर महाविद्यालयाच्या आवाराला पोलिसांचे संरक्षण देण्यात आले, असे संस्थेचे म्हणणे आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी संस्थेच्या व्यवस्थापनाने केली आहे.
‘‘वालचंद महाविद्यालय हे महाराष्ट्र टेक्निकल एज्यकेशन सोसायटीची शाखा असून महाविद्यालयाचे संचालक डॉ. परिशवाड यांनी गेल्या चार वर्षांचा हिशोब संस्थेला दिलेला नाही. यामुळे घटनेनुसार त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. महाविद्यालयामध्ये कोणताही आततायी प्रकार घडलेला नसून नियमानुसारच कृती करण्यात येत आहे. या कालावधीत डॉ. देवमाने यांची नियुक्ती संचालक म्हणून संस्थेने केली आहे.’’
– पृथ्वीराज देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र टेक्निकल एज्यकेशन सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:57 am

Web Title: bjp leader bullying in sangli
टॅग : Bjp
Next Stories
1 रास्तभाव दुकानांच्या कोटय़ात सातत्याने कपात!
2 रेवस बंदर प्रकल्प रखडला
3 रायगड जिल्ह्यचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के
Just Now!
X