कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षभराची कामगिरी ही पूर्णतः अपयशी, गोंधळलेली, संवेदनशीलता हरवलेली आणि विकास कामांपासून दुरावलेली आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. सत्ता चालवणे झेपत नसेल तर ती सोडून द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त बोलताना त्यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.ते म्हणाले, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजक, महिला, युवक अशा कोणत्याही क्षेत्रातील प्रश्न या सरकारला सोडवता आलेले नाही. उलट तीन पक्षाच्या सरकारमधील विसंवाद सातत्याने समोर येत आहेत.

विकासाची कोणतीही कामे त्यांना करता आली नाहीत. निधी नसल्याचे कारण सातत्याने सांगितले जाते. केंद्र शासनाकडून जीएसटीची रक्कम मिळाली नाही मी असे तुणतुणे वाजवले जाते. कर्ज काढून सरकार चालवता येणे शक्य आहे. पूर्वीच्या सरकारने कर्जे वाढून ठेवले आहे असा गळा काढला जातो. खरे तर या सरकारमध्ये शासन चालवण्याची हिंमत नाही. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम सुरू आहे. एकदा घर विकत घेतल्यानंतर त्याच्यातील दोषाबद्दल जुन्या मालकाला बोल लावता येत नाही. त्या घराची डागडुजी करून चालवायचे असते, असे व्यावहारिक संदर्भ देवून पाटील यांना झेपत असेल तर सत्ता सोडावी, असा सल्ला दिला.

भाजपावरील हिंदुत्वाच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापित केलेली प्रखर हिंदुत्वाची विचारधारा भाजपाने पुढे नेली आहे. त्याला लोकांचे पाठबळ असल्याचेही दिसून आले आहे. भाजपामुळे हिंदू ताकदवान झाला. देशातील दंगली संपल्या. हे पाहता खरे हिंदुत्व भाजपाचे आहे की कोणाचे हे जनता जाणते. त्यामुळे हिंदुत्वाचे दलाल कोण आहेत आणि बेगडी हिंदुत्व कोणाचे आहे; हे जनता जाणून आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला