एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावतीमधील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. गुरुवारी ही शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता भाजपाने यशोमती ठाकूर यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं असं म्हणत महिला व बालविकास मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटवरुन ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी यशोमती ठाकूर यांना टॅगही केलं आहे.


काय आहे प्रकरण

मारहाणीची ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी  राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती.  याप्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि  मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील १ साक्षीदार फितूर झाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी फितूर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले.

आणखी वाचा- पोलीस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

निकालावर यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रितिक्रिया देताना, “न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. पण, आम्ही निर्दोष आहोत. या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत. या निकालाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आहे,” असं म्हटलं आहे.