“आतापर्यंत भाजपामध्ये अनेकजण आले आणि गेले. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं होत नाही,” असा टोला भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी सायंकाळी बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.

“आजही भाजपाच्या ताब्यात ८० टक्के महानगरपालिका आहेत. त्यामुळे कोणी मागणी केली तर त्या महापालिका सरकार बर्खास्त करणार आहे का? अवास्तव मागणी करून प्रसिद्धी मिळवणं हेच सध्या काम दिसत आहे. याविषयी चर्चा करणंही योग्य वाटत नाही. तुम्ही पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरू झाला असं होतं नाही. भाजपा हा मोठा पक्ष असून आजवर भाजपातून अनेक जण गेले आणि आले. त्यामुळे पक्षाला कोणताही फरक पडला नाही. भविष्यातही भाजपा हा पक्ष वाढतच जाईल,” असा दावाही गिरीश महाजन यांनी केला. सध्या खडसे आणि महाजन यांच्यात शाब्दीक चकमक सुरू आहे. मुक्ताईनगरमध्ये भाषणादरम्यान खडसे यांनी पुढील काळात कोण किती सक्षम आहे आणि कुणाच्या मागे किती लोक आहेत हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं होतं. यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

“भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही. पक्षाच्या मागे कोण आहे हे येत्या काळात दिसेलच. लोकं येतील आणि जातील. पक्ष हा वाढत चालला आहे हे आपल्याला दिसतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याला महत्त्व देण्याची गरज नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एका विचारधारेवर पक्ष चालत असून पक्ष वाढविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतल्याचं महाजन यांनी सांगितले. मी आहे म्हणून पक्ष असल्याचे म्हणणारे आता इतिहासजमा झाले आहेत. आजही जे भाजप सोडत आहेत, त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही महाजन यांनी नमूद केले. पुराणिक यांनी करोना काळात भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन काम केल्याचे सांगितले. मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्या. या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केलं.

भाजपासोबतच राहणार – रक्षा खडसे

रक्षा खडसे यांनी आपण भाजप विचारसरणीत वाढलो असून चार वर्षांत खासदारकीचे तिकीट मिळो ना मिळो, आपण भाजप सोबतच राहणार, असं सांगितलं.