जालना शहरात भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असताना भाजपच्या किसान आघाडी जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी कुटुंबाने त्यांच्या शेतात आणलेल्या जेसीबी मशीनला विरोध केल्यामुळे या कुटुंबाला अमानूष मारहाण करण्यात आली.

भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात जेसीबी मशीन आणले. त्यावरुन वादाला सुरुवात झाली. खांडेभारड कुटुंबाने जेसीबी मशीन त्यांच्या शेतात आणले त्याला विरोध केला. रावसाहेब भवरला या सामान्य शेतकऱ्याने केलेला विरोध सहन झाला नाही. न्यूज १८ लोकमतने हे वृत्त दिले आहे.

त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण केली. त्याने कुटुंबातील महिलांवर देखील हात उचलले. भवर आणि त्याच्या समर्थकांनी आपल्याला खडड्यात टाकून जेसीबीच्या मदतीने खड्डा बुजवण्याचाही प्रयत्न केला असा आरोप खांडेभारड कुटुंबाने केला. महत्वाच म्हणजे जालन्यात भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असताना हे सर्व घडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते त्यावेळी जालन्यात होते. मारहाण झालेल्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे पण अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.