मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. तसंच आंदोलन करताना त्यात कुठल्या कुठल्या पक्षांची लोक आलेली आहेत हा संशोधनचा विषय आहे, असंही ते म्हणाले होते. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.

“मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढा. मी अनुभवातून सांगतो या व्यक्तीला काही कळत नाही. उद्धव ठाकरेंप्रमाणे यांना पण सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाहीत. या पदावर हुशार व आक्रमक व्यक्तीची गरज आहे,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते चव्हाण?

“मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केलं जातंय. ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. आंदोलन करताना त्यात कुठल्या कुठल्या पक्षांची लोक आलेली आहेत हा संशोधनचा विषय आहे. जे समजाकरीता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना बदनाम करण्याकरता ते यात शिरले आहेत. प्रामाणिकपणे आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे पण ते तुम्ही कोणाविरुद्ध करत आहात हा मूळ प्रश्न आहे. जिथं ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रश्नच येत नाही तिथं तो कसा आला? यामागे राजकीय षडयंत्र आहे,” असं चव्हाण म्हणाले होते.

ओबींसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायची कोणाचीच भूमिका नाही. मागच्या सरकारचीही ती नव्हती आणि आमच्या सरकारचीही नाही. त्यामुळे आंदोलन करण्याऐवजी तुम्ही न्यायालयात येऊन तुमची बाजू भक्कमपणे मांडावी, असं आवाहनही यावेळी चव्हाण यांनी मराठा आंदोलकांना आणि विरोधकांनाही केलं होतं.

सरकार हतबल नाही

“मराठा आरक्षणाबाबत सरकार हतबल नाही. सरकार कमी पडतंय ते गंभीर नाही असे आरोप वारंवार केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. ज्यांना असं वाटतं की सरकारकडे चांगले वकील नाहीत त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्यासोबत यावं. मराठा समाजाकडेही निष्णांत वकील आहेत त्यांना आमचा पाठींबाच आहे. आरक्षणासाठी देशातील नामवंत मोठे वकील आपण दिले आहेत. यामध्ये मुकूल रोहतगी, अॅड. पटवालिया, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांचा समावेश आहे,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.