शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता. भाजपा नेते राम कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला असून या शिवसेनेला काही कळण्यापूर्वी त्यांचीच बदनामी झाल्याचं ते म्हणाले.

“सूड भावनेतून शिवसेनेनं कंगना कणौतच्या कार्यालयावर कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला खडेबोल सुनवत यातून आपला हात काढून घेतला. आता काँग्रेसही त्यांना ऐकवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघांनी ठरवून शिवसेनेवर राजकीय मात केली. शिवसेनेला काही कळेल त्यापूर्वी यात त्यांचीच बदनामी झाली,” असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.

पालिकेकडून कारवाई

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.