उद्या सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार असं भाजपा नेते राम कदम यांनी म्हटलं आहे. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातच आंदोलन केलं होतं. तसंच मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरं लवकरात लवकर उघडा अशी मागणी केली होती. तर ठाकरे सरकारने दिवाळीनंतर मंदिरं उघडली जातील असे संकेत दिले होते. दरम्यान आता शनिवारी झालेल्या निर्णयानुसार राज्यातली मंदिरं उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून उघडली जाणार आहेत. करोना संकट आणि लॉकडाउनचा ८ महिन्यांचा काळ यानंतर मंदिरं खुली होणार आहेत. सगळ्या प्रकारच्या करोना गाइडलाइन्स पाळूनच भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

भाजपाने सिद्धिविनायक मंदिरात आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. करोना काळात मंदिरं बंद राहिल्याने तिथली अर्थव्यवस्थाही कोलमडते त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावा असं भाजपाने म्हटलं होतं. एवढंच नाही तर राज्यभरातही आंदोलन करण्यात आलं होतं.

भाजपाच नाही तर मनसेनेही मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. बार आणि रेस्तराँ उघडले जातात मग मंदिरं का बंद आहेत? असा प्रश्न मनसेनेही उपस्थित केला होता. दरम्यान योग्य वेळ आली की प्रार्थनास्थळं उघडली जातील असं उत्तर यावर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरपासून प्रार्थनास्थळं उघडली जातील असं म्हटलं आहे. यावर भाजपाचे नेते राम कदम यांनी हा ठाकरे सरकारचा पराभव आहे असं म्हटलं आहे. जनतेच्या दबावापुढे हा पराभव झाला आहे असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.