“मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा, करोना स्थिती हाताळण्यातील अपयश, महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत ही स्थिती पाहता कर्तृत्वहीन सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव आहे. सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी आहे,” अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापुरात रविवारी पत्रकार परिषदेत केली.

“ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले. या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख , हालअपेष्टा जाणून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत असताना ठाकरे त्याबाबत चकार शब्दही उच्चारण्यास तयार नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” असंही उपाध्ये म्हणाले.

आरक्षणाचा खेळखंडोबा

“राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केल्याने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान पाहता सरकारची मदत तोंडाला पाने पुसणारी आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.