शिवसेना नेतृत्वाशी चर्चा केल्याने समर्थक नाराज; विधान परिषद निवडणूक लढविण्याची तयारी

भाजप नेत्यांच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र पक्षाची स्थापना, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा हे सारे केल्यावरही भाजपकडून विधान परिषद पोटनिवडणुकीत पाठिंबा नाकारण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे संतप्त झाले आहेत. त्यातच भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राणे यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतानाच राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.  विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजप पाठिंबा देईल, असे राणे यांनी गृहीत धरले होते. भाजपची १२२ मते आणि भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोटय़ा पक्षांची मते मिळावीत, अशी राणे यांची अपेक्षा आहे. कमी पडणारी ८ ते १० मते अन्य पक्षांमधून मिळविण्याची तयारी राणे यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही, असे राणे यांनी भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अगदी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन उमेदवार पुरस्कृत केला तरीही विजयात काही अडचण येणार नाही, असे  नारायण राणे यांचे गणित आहे.

राणे यांना शिवसेनेचा विरोध लपून राहिलेला नाही. राणे यांना पाठिंबा तर देणार नाहीच, पण त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

भाजप नेतृत्वाने राणे यांना डिवचण्याकरिताच ‘मातोश्री’ची वाट धरल्याची भावना राणे समर्थकांची झाली आहे. शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली तरीही मतांचे गणित जुळते. मग ठाकरे यांची भेट घेण्याची आवश्यकता का होती, असा सवाल राणे समर्थकांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राणे यांनी पक्षत्याग करताना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे आणि चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळून राणे यांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – राणे

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवापर्यंत आहे. ही पोटनिवडणूक लढवण्याची सारी तयारी राणे यांनी केली आहे.