कोकणातील नाणार येथील ‘ऑईल रिफायनरी’ प्रकल्पावरून शिवसेना- भाजपात संघर्ष सुरु असतानाच नागपूरमधील काटोलचे भाजपाचे नाराज आमदार आशीष देशमुख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘नाणार’मधील प्रकल्प विदर्भात आणावा, यासंदर्भात ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यातील बहुचर्चित नाणार रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना, मनसे आणि अन्य पक्षांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प नाणारऐवजी विदर्भात सुरु करावा, अशी मागणी काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी केली होती. याच संदर्भात त्यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते. देशमुख यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरे यांनी आशीष देशमुख यांच्या मतदारसंघात हा प्रकल्प दिला जावा, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेण्यास संमती दिली असून त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. यामुळे विदर्भाला चांगले दिवस येणार आहेत. नाणार प्रकल्पाला स्थानिक तसेच शिवसेनेचा विरोध असल्याने तो विदर्भातील काटोलमधील औद्योगिक वसाहतीत उभारण्यात यावा, असे देशमुख यांनी म्हटले आहे.