मंदार लोहोकरे | चैत्र एकादशी दिवशी म्हणजे ४ एप्रिल रोजी, पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची पूजा करणे महागात पडले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य, भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर व शिवसेनेचे सदस्य संभाजी शिंदे यांनी यांनी श्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन, साथीचे रोग प्रतिबंध कायदा अन्वये आमदार ठाकुर आणि शिवसेना सदस्य शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  देशात सर्वत्र करोनाचे संकट घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू केला आहे. तर राज्य सरकारने जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कडक कायद्याची देखील अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील महत्वाची चैत्र एकादशी ४ एप्रिल रोजी झाली. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चैत्र वारी रद्द  केली. मात्र एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे नित्यपूजा मंदिर समिती सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर आणि संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.


या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील हवालदार बालाजी शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात दि ४ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून आमदार सुजितसिंह ठाकूर हे पंढरपूर येथे कोणीतीही कायदेशीर परवानगी न घेता पंढरपूर येथे आले. तसेच आमदार ठाकुर आणि सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली. सध्या संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनिमनाचे उल्लंघन केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे एकत्र जमून करोना विषाणूचा फैलावाचा धोका आहे याची जाणीव असताना पूजा अर्चा केली या आशयाची फिर्याद हवालदार शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर आणि त्यांची पत्नी तसेच शिवसेनेचे संभाजी शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कारे हे करीत आहेत. मात्र या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सी.सी.टीव्ही फुटेज तपासा : आमदार ठाकूर
चैत्र एकादशीची नित्यपुजा करणेबाबत मंदिर समितीने ७ जानेवारी २०२० रोजी निर्णय घेतला. नित्यपुजेला मंदिरात मी , पत्नी व एक असे तिघेच होतो‌. या बाबत सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी एक अहवाल दिला आहे तो पहावा ‌. काहीजणांना समितीमध्ये शिरकाव करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी माहिती दिली.