सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे बेडा जंगम नावाचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून हे जातीचे प्रमाणपत्र जप्त करण्याबरोबरच त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हेच जात प्रमाणपत्र गहाळ झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वळसंग पोलीस ठाण्यात जात प्रमाणपत्र गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अचानकपणे हे जात प्रमाणपत्र गहाळ होण्याचे गूढ मात्र कायम राहिले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील वीरशैव मठाचे मठाधिपती असलेले नुरूंदस्वामी गुरूबसय्या हिरेमठ ऊर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे गतसाली सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांनी सादर केलेले बेडा जंगम हे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर यासंदर्भात प्राप्त तक्रारींवर सुनावणी होऊन त्यात खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याचे जात प्रमाणपत्र बनावट आणि खोटे असल्याचे निष्पन्न होऊन त्यात हे जात प्रमाणपत्र तातडीने जप्त करण्याचा तसेच हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्यासह अन्य संबंधितांविरूध्द तातडीने फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यातील उल्लेखनीय बाब अशी की, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना समितीने खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याना त्यांनी शासनाकडून मिळविलेले मूळ जात प्रमाणपत्र हजर करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. परंतु अखेपर्यंत हे मूळ जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करण्यात आले नव्हते. सुनावणीअंती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अखेर खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याचे म्हणणे फेटाळल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा असतानाच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे  कधीही हजर न केलेले जात प्रमाणपत्र गहाळ झाल्याची बाब खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याकडूनच समोर आणली गेली आहे. त्यांचे शिष्य शिवसिध्द बुळ्ळा हे जात प्रमाणपत्र घेऊन ९ फेब्रुवारी रोजी सोलापूरकडे येत असताना कुंभारीजवळ हे प्रमाणपत्र गहाळ झाल्याची तक्रार बुळ्ळा यांनी पाच दिवसांनंतर वळसंग पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

निकालाला न्यायालयात आव्हान

एकीकडे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याचे मूळ जात प्रमाणपत्र हजर करण्यासाठी वारंवार सूचना देऊनसुध्दा एकदाही हे मूळ प्रमाणपत्र समितीकडे हजर करण्यात आले नव्हते. नंतर योगायोगाने समितीकडून या प्रकरणाचा निकाल होण्याची प्रतीक्षा असताना हेच मूळ जात प्रमाणपत्र कसे गहाळ होते, याचीही उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्याच्या वतीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविणाऱ्या सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.