महाराष्ट्र भाजपचे ट्विटर हँडल सकाळी ज्या ज्या नेटकऱ्यांनी पाहिले असेल त्यांना ते ट्विटर हँडल काँग्रेसचे आहे की काय? असाच प्रश्न पडला असेल. याला घडलेले कारणही तसेच आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या @BJP4Maharashtra या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ट्विट करण्यात आले होते.

राज्य प्रशासनात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस सरकार ३० टक्के कर्मचारी कपात करायला निघाले आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आहे की ‘फूल इन महाराष्ट्र’ असे दोन हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरण्यात आले. तसेच हा ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस, संजय निरूपम, सचिन सावंत या सगळ्यांना टॅगही करण्यात आले होते. चुकून टाकण्यात आलेल्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली होती. चूक लक्षात आल्यावर हा ट्विट हटवण्यात आले. मात्र या ट्विटचा स्क्रीन शॉटही व्हायरल होतो आहे.

 

हेच ट्विट आज सोशल मीडियावर ट्रोल होत होते

 

अनेक नेटकऱ्यांनी या ट्विटवरून महाराष्ट्र भाजपची खिल्ली उडवली आणि त्यांना ट्रोल केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून भाजपने सत्ता काबीज केली. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी या सोशल मीडियाचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही चांगलाच उपयोग झाला.

मात्र यातले संभाव्य धोके काय असू शकतात? हे आता या महाराष्ट्र भाजपच्या ट्विटवरून समोर आले आहे. ट्विट हटवण्यात आले असले तरीही साधारण एक तास हे ट्विट याच ट्विटर हँडलवर होते. त्यामुळे या ट्विटचा स्क्रीन शॉट अनेक नेटकऱ्यांनी काढून ठेवला आहे. हा ट्विट नेमका कोणी केला? ही चूक कशी झाली या सगळ्याच्या खोलात न शिरता भाजपने या सगळ्यावर मौन बाळगणे पसंत केले.