मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

“माझ्या जेव्हा मुलाखती घेतल्या जातात तेव्हा तुमचा गुरु कोण असं मला विचारलं जातं. अशावेळी साहजिकपणे माझे वडील माझे गुरु असल्याचं मी सांगते. पण आज ते नाही आहेत. त्यांच्या पश्चात जर कुणी असेल तर मी सांगते देवेंद्र फडणवीस माझे गुरु आहेत”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “द्रोणाचार्यांसाठी अर्जून हा त्याचा प्रिय शिष्य होता. त्याच्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरुसाठी अंगठा कापून देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही”.

मुंडे-मेटे यांच्यातील वैर महाजनादेश यात्रेतच चव्हाट्यावर
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्यातील वैर भाजपाच्या महाजनादेश यात्रेतच चव्हाट्यावर आले. महाजनादेश यात्रा सोमवारी बीड जिल्ह्यात दाखल झाली. यात्रा दुपारी बीड शहरात आल्यानंतर आमदार विनायक मेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथात चढले. मेटे येताच दोन्ही मुंडे भगिनी रथातून खाली उतरतून निघून गेल्याने सर्व काही आलबेल नसल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.