जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली जात नसली, तरी सभासदांचे हित पाहूनच निर्णय घेऊ, मात्र निवडणुकीत कोणताच पक्ष एका ठिकाणी राहिलेला नाही. त्यामुळे आमचाही भाजप एक ठिकाणी नाही. मात्र तरीही काँग्रेसमधील थोरात व विखे या दोन्ही गटाला भाजपने समान अंतरावर ठेवण्यात यश मिळवले आहे. पालकमंत्री म्हणून दोन्ही गटावर माझेच नियंत्रण आहे, असे वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नियोजन भवनमधील खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या मताला किंमत आली आहे. आम्ही सभासदांच्या सोयीची भूमिका घेऊ. आमची भूमिका अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी स्पष्ट होईलच असेही ते म्हणाले.
शिर्डीच्या साईबाबा देवस्थानचा अध्यक्ष भाजपचाच होईल, याचा पुरुच्चार करुन शिंदे म्हणाले, की देवस्थानच्या अध्यक्ष किंवा विश्वस्तपदासाठी मी इच्छुक नाही. शिर्डीबरोबरच शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्तही लवकरच नियुक्त केले जातील. नाशिक येथे जुलै, ऑगस्टमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यापूर्वी हे विश्वस्त नियुक्त केले जातील, असे शिंदे यांनी सांगितले.
सध्या कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. दोन दिवसांत त्याचे पाणी श्रीगोंदे, कर्जतमध्ये पोहोचेल. मागणीपूर्वी दोन दिवस आधीच पाणी सोडले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच फळबागांसाठीही त्याचा उपयोग होईल. आता मुळाचे आवर्तन सोडण्यासाठी आ. शिवाजी कर्डिले यांच्याशी चर्चा केली आहे, कालवा निरीक्षक समितीची बैठक घेऊन लगेच पाणी सोडले जाईल, त्यासाठी १ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गोदावरीचेही आवर्तन सोडण्याचा विचार आहे. लोकप्रतिनिधींनी एकत्र याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.