आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती निश्चित असली तरी जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यासाठी पुन्हा बैठक होईल. आगामी मुख्यमंत्री मात्र भाजपचाच असेल, असा दावा भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस सरोज पांडे यांनी रविवारी केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्यासाठी सरोज पांडे यांनी जिल्हा दौरे सुरू केले असून, त्याची सुरुवात त्यांनी नगरमधून केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात भाजपला मिळालेल्या १२२ जागा जिंकूच, मात्र युतीमधील जागांवरही ताकद लावून त्या जिंकून आणू. शिवसेना वगळता इतर घटक पक्षांना दिल्या जाणाऱ्या १८ जागा मात्र त्या पक्षांना कमळ चिन्हावरच लढवाव्या लागतील, असेही पांडे यांनी सूचित केले.

‘‘लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला राज्यात अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. इतर पक्षांना भवितव्य न राहिल्याने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यांना पक्षाची विचारधारा मान्य आहे, त्या सर्वाचे पक्षात स्वागत केले जाईल’’ असे पांडे यांनी स्पष्ट केले. भाजप व शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा व घटक पक्षांना १८ जागा हे सूत्र अंतिम आहे का, या प्रश्नावर युती निश्चित असली तरी जागावाटप अद्याप निश्चित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जागावाटपाबाबत चर्चेसाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा २० जुलैला मुंबईत येत आहेत, असे त्यांनी सांगितले.