विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच व कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी भाजप काँग्रेसला खेळवीत असून काँग्रेसचे जुने हिशोब चुकते करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. या कुरघोडीच्या राजकारणात भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करीत असल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांची निवड केली आहे.
विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या आघाडीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला असला तरी तसे लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेले नाही.
त्यामुळे संख्याबळाचा विचार करता हे पद काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळावे, असे पत्र काँग्रेसने अध्यक्षांना दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या पदावर दावा केल्याने कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, अशी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भूमिका आहे. काँग्रेसला झुलवीत ठेवण्यासाठी कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी काही दिवस विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पुढे ढकलला जाण्याचीही शक्यता आहे. तो लवकरात लवकर व्हावा, यासाठी काँग्रेसने विधान परिषदेत संख्याबळ नसताना तेथे सभापतींना एक निवेदन दिले आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे २८ सदस्य आहेत, तर काँग्रेसचे २० आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांची निवड मंगळवारी जाहीर व्हावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी भेट घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिले गेले, तर लगेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मुंडे यांना द्यावे, असे राष्ट्रवादीचे दबावतंत्र आहे. तर काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याच्या भूमिकेत आहे.
तरुण नेतृत्वाला संधी
ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करून राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे. मराठवाडा आणि बीड जिल्हा हा महत्त्वाचा असून अन्य समीकरणे जुळविण्यासाठी ही निवड करण्यात आली.

‘हिशोब चुकते करणार’
काँग्रेसने त्यांचे सरकार असताना जे राजकारण आमच्याविरोधात केले, त्याचे हिशोब चुकते करणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी‘लोकसत्ता’ला सांगितले. कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो, असे ज्येष्ठ मंत्री खासगीत सांगत आहेत, मात्र हा मुद्दा फार न ताणता पुढील आठवडय़ापर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जावा, अशी भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांची भूमिका आहे.