सात कोटी रूपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावावरही आता राजकारण सुरू झाले आहे. डिसले यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारकी मिळण्यासाठी भाजपाकडून राज्यपालांना शिफारस करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

युनेस्को व लंडनस्थित वॉर्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरचे जि. प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दरेकर हे शनिवारी डिसले यांच्या बार्शी येथील निवासस्थानी आले होते. डिसले यांचा त्यांनी सत्कार केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी, आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याने देशाचे नाव जगाच्या पाठीवर उज्ज्वल करणाऱ्या डिसले गुरूजींसारख्या शिक्षकाला विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त केल्यास त्याचा राज्याला निश्चितच उपयोग होणार आहे. म्हणूनच तशी शिफारस भाजप करणार असल्याचे सांगितले.

डिसले यांना राज्य शासन वा केंद्र शासनाकडून विशेष पुरस्कार मिळावा, तसेच राज्य विधिमंडळ अधिवेशनात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर व्हावा म्हणूनही भाजप शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. आसीफ तांबोळी हे उपस्थित होते.