केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून भाजपावर टीका केली जात आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

“केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. कडाक्याच्या थंडीत त्यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जातोय. भांडवलदारांच्या हितासाठी भाजप सरकार शेतक-यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.” असा आरोप थोरात यांनी केला आहे.

आणखी वाचा- नाव शेतकरी कायदा, संपूर्ण फायदा मात्र अब्जाधीश मित्रांचा – प्रियंका गांधी

“शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरले असताना आडमुठी भूमिका न घेता त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सरकारचे कर्तव्य आहे. पण केंद्र सरकार शेतक-यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतक-यांचा आवाज बुलंद करण्यासाठी #SpeakUpForFarmers मोहिमेत सहभागी व्हा!” असं देखील थोरात यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- शेतकरी काय दहशतवादी आहेत का? संजय राऊत मोदी सरकारवर संतापले…

संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील शेतकरी आंदोलनावरून, ‘चलो दिल्ली’चा नारा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे. “चलो दिल्ली…केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट केलं आहे.