पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या दि. २६ ला नगर येथे ‘जनकल्याण पर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
पत्रकार परिषदेत गांधी यांनी सांगितले, की दि. २६ला टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह भाजप-शिवसेना-भारिप-रासप अशा महायुतीतील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या वतीने देशभर हा उपक्रम राबवण्यात येत असून केंद्र सरकारच्या विविध निर्णयांची माहिती या वेळी देण्यात येणार आहे.
गांधी यांनी या वेळी त्यांच्या वर्षभराच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. ते म्हणाले, केंद्र सरकारने मागच्या वर्षभरात सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. जिल्ह्य़ातही याच धर्तीवर विविध विकासकामे असून विविध योजनांमधून त्यासाठी मोठा आर्थिक निधी उपलब्ध केला जात आहे. स्थानिक विकासनिधीतून ५ कोटींची कामे करण्यात आली असून पुढच्या कामांनाही तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्तेनिधीतून सुमारे २३ कोटी, विविध आजारांसाठी विविध नागरिकांना ६७ लाख रुपयांचा पंतप्रधाननिधी या काळात उपलब्ध करून घेता आला. नगर शहरातील एका प्रभागासह मतदारसंघातील ९ गावे दत्तक घेतली आहेत. येथेही विविध कामे सुरू आहेत, असे गांधी यांनी सांगितले. प्रा. मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, अनिल गट्टाणी, गीतांजली काळे आदी या वेळी उपस्थित होते.
नगरला दुसरे आयुर्वेद महाविद्यालय
केंद्राच्या आयुष योजनेतून जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारात आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. येथे ३०० खाटांचे रुग्णालय असेल, असे ते म्हणाले. भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा विषयही मार्गी लागला असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच त्याला मान्यता दिली. त्यानुसार लवकरच केंद्र व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार होईल, अशी माहिती त्यांनी दिली, चांदबिबी महाल ते किल्ला अशा रोप-वेची योजनाही प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले.
विकासातील अडसर
माहिती अधिकाराशी संबंधित पाच, सहा जण नगर शहराच्या विकासात अडसर बनले आहेत, अशी टीका गांधी यांनी केली. त्यांनीच शहराला वेठीस धरले आहे, त्यांच्यामुळे अनेक कामे थांबली आहेत, असा आरोप गांधी यांनी केला.