लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेस पक्षात आल्यानंतर काही काळानंतर लगेचच उर्मिला यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान उर्मिला यांनी पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितलं असून नाराजीही व्यक्त केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलं.

राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “एक कलाकार म्हणून जगातील ऐशोआरामाची अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी माझ्या आयुष्यात नव्हती. पण सामाजिक बांधिलकी, सामाजिक कृतज्ञता समजणाऱ्या एका कुटुंबात आणि प्रदेशात माझा जन्म झाला होता. त्यामुळे मी काहीतरी लोकांना थोडं परत द्यावं या विचाराने राजकारणात आले होते”.

“पण त्या काळात मी जे करु इच्छित आहे ते करायला मिळत नाहीये असं वाटलं. घिसडघाई होत असल्याची जाणीव होत होती. माझी पत्रं लिक केली गेली. त्या पत्रांमध्ये मी केवळ मुंबई स्तरावर पक्षात काही बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यातलं काहीही होत नव्हतं. आपण करत असलेले प्रयत्न मर्यादित होत असून, काहीच होत नाहीये तर नावापुरतं तिथं राहण्यापेक्षा तीच गोष्ट एखाद्या पक्षात न राहता स्वतंत्रपणे करु इच्छिते आणि करत आहे,” असं उर्मिला यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये तुमचा भ्रमनिरास झाला का ? असं विचारण्यात आला असता त्यांनी नकार दिला.