जळगाव : शहरातील ‘आतीया रिचार्ज’ नावाने असलेल्या फेसबुक खात्यावर एका व्यक्तीने आपण ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेचा जिहादी दहशतवादी असल्याची माहिती दिली आहे.  देशातील पाच मोठय़ा शहरांत आपल्या साथीदारांसह आत्मघातकी बॉम्बहल्ले करणार असल्याची धमकी त्याने दिली असून याची गंभीर दखल घेत जळगाव पोलिसांच्या सायबर शाखेने तपास सुरु केला आहे.

संशयिताने संभाव्य बॉम्बस्फोटाच्या कटात आपली पत्नी आणि आपला भाऊ  हे दोघेही सहभागी असल्याचे म्हटले आहे. त्याने देशाच्या भावी पंतप्रधानांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आपण पाठीत खंजीर खुपसत नसल्याचा दावा करत त्यासाठीच हा संदेश टाकल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यासाठी आपण  तयारी करीत असून कोटय़वधी रुपये खर्च करून आता हे काम आम्ही आमच्या बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी करीत आहोत. देशात कायद्याने न्याय न मिळाल्यामुळे बदला घेण्यासाठी आपण हे काम करीत आहोत. शक्य असेल तर आम्हांला पकडून दाखवावे आणि देश वाचवावा, असे आव्हान त्याने दिले आहे. दरम्यान, ‘आतीया रिचार्ज’ नावाचे दुकान शहरातील शेरा चौकात सुरेंद्र जैन व्यापारी संकुलात आहे. या दुकानाच्या माध्यमातूनच संशयिताने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती प्राप्त झाली आहे. फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हांपासून संपूर्ण कुटूंब जानेवारीपासून फरार आहे.