27 November 2020

News Flash

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका

बचाव पथकाने ३ हजार १६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

ब्रम्हपुरी तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून बचाव कार्यात सोमवारी पूरात अडकून पडलेल्या ३ हजार १६० लोकांना दुपारी तीन वाजेपर्यंत बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सोमवारी सकाळी हेलिकॅप्टरने लाडज गावातील बहुसंख्य लोकांना बाहेर काढले गेले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लाडजसह सकाळपासून या भागाचा दौरा करित पूरग्रस्तांना दोन वेळच्या जेवणासह सर्व प्रकारची मदत तात्काळ उपलब्ध करून दिली. ब्रम्हपुरीत रविवारी पुराने कहर केल्याने अर्धा तालुका पाण्याने कवेत घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून तीन ते चार फूट पाण्याची पातळी वाढल्याने २५ ते ३० गावे पाण्याखाली आली असून यापूर्वी जी गावे पाण्याच्या खाली नव्हती ती देखील पाण्याखाली आल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. याचा फटका सामान्य जीवनावर पडल्याने तालुका व शहर वासीयांचा जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरामुळे संपूर्ण ब्रम्हपुरी तालुक्यातील धानपिक नष्ट झाले आहे. कधी नव्हे एव्हढा पाणी गोसिखुर्द धरणातून सोडल्याने जीवनावश्यक वस्तूंचे गोदाम पाण्याखाली आल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गँस गोदामात पाणी शिरल्याने वितरण ठप्प झाले आहे. तर ब्रम्हपुरी शहराला ३० ऑगस्ट पासून पाणी पुरवठा बंद झाला आहे,कारण नान्होरी पंप हाऊस पुरात बुडाला असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पंप बंद करण्यात आला आहे.पुराचा सर्वाधिक फटका बेलगाव व लाडज गावांना बसला आहे. या गावातील महिला, पुरुष यांनी रविवारची रात्र जागून काढली. त्यानंतर आज सकाळी हेलिकॅप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरवाळे यांनी दिली. सोमवारी सकाळपासून पूराचे पाणी कमी होऊ लागले असले तरी परिस्थिती आटोक्यात येण्यास मंगळवार किंवा बुधवार उजाडेल असे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी सांगितले.

दरम्यान एनडीआरएफ, मिलिटरी, जिल्हा बचाव पथक, पोलिस बचाव पथकासह २० बोट बचाव कार्यात आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार पूरग्रस्त भागात ठाण मांडून बसले असून प्रत्येकाला दोन वेळच्या जेवणासह सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह रविवारी व आज या भागाचा दौरा देखील केला. वैनगंगा नदीच्या पुरामुळे ब्रम्हपुरी, मूल व सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या घरांची पडझड झाली असून उभे पिक पाण्याखाली आहे. तेव्हा तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार सुधीर मुनंटीवार यांनी केली आहे. तर भाजपाने या भागात जेवणाची पॉकीट पूरग्रस्तांना वितरीत केली. पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या अशी मागणी आपच्या अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी, सुनील मुसळे यांनी केली आहे.

  • ग्रामीण विद्यार्थी परीक्षेस मुकणार –

१ ते ६ सप्टेंबर ला होणाऱ्या जेईई परिक्षेकरिता ग्रामीण विद्यार्थी बसले आहेत. परंतू सर्व रस्ते बंद असल्याने त्यांचे भविष्य टांगणीवर आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करून त्यांना दिलासा देण्याची आर्तहाक विद्यार्थी समवेत पालक वर्ग करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:42 pm

Web Title: bramhapuri taluka badly affected by flood water in chandrapur district administration trying relocate citizens psd 91
Next Stories
1 चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात २०३ नवे करोनाबाधित रुग्ण
2 महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर
3 ई-पासची अट रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Just Now!
X