News Flash

सांगलीत टोळय़ांनी मांडला लग्नाचा बाजार

समाजात वधू मिळत नाही म्हणून मुलगी खरेदी-विक्री करणारे दलाल आणि लग्नाच्या पवित्र नात्याचा बाजार मांडणाऱ्या टोळ्याच सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार सागली जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

| July 26, 2014 04:15 am

समाजात वधू मिळत नाही म्हणून मुलगी खरेदी-विक्री करणारे दलाल आणि लग्नाच्या पवित्र नात्याचा बाजार मांडणाऱ्या टोळ्याच सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार सागली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अगतिक अविवाहित तरुणांच्या बरोबर कुटुंबांना लुबाडण्याचे बरेच प्रकार घडले असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगावची उघडकीस आलेली घटना म्हणजे हिमनगाचे टोक मानले जात आहे.
सुरेश नेमगोंडा पाटील या तरुणाचे लग्न लांबले होते. सुरेशच्या समाजात मुलींचे अल्प प्रमाण असून उपलब्ध असणाऱ्या मुलींची शेती व्यवसाय करणारा नवरा नको अशी भूमिका असल्याने त्याला समाजात वधू मिळेना झाली होती. वंशसातत्य कायम राहावे आणि नसíगक गरज भागविण्यासाठी समाजातील वधू मिळत नाही हे पाहून त्याने परजातीतील वधू करून आणण्याची तयारी दर्शवली. परजातीतील आणि परराज्यातील विवाहउत्सुक तरुणांना वधू मिळवून देणे हा व्यवसाय करणारी टोळीच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असून या टोळीत केवळ पुरुषच आहेत असे नाही तर महिलाही या टोळीत सक्रिय आहेत.
गेल्या वर्षी सांगली पोलिसांनी मिरजेतील एका लॉजवर धाड टाकून एका मुलीसह तिघांच्या टोळीला पकडले होते. त्यावेळीही अविवाहित प्रौढ तरुणांचे लग्न लाऊन देणारी टोळी उघडकीस आली होती. कर्नाटकातून ९ मुलींचा लग्नाच्या बाजारात सौदा केला असल्याची कबुली त्या टोळीने दिली होती. पोलिसांनी या मुलींचा शोध घेतला असता बऱ्याच मुली संसाराला लागल्या असल्याने तपास आहे त्या स्थितीत थांबवण्यात आला.
या टोळया ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहेत. विवाहइच्छुक तरुण व त्यांच्या कुटुंबाला गाठून शहरातील एखाद्या लॉजवर मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. मुलगी पसंत पडल्यानंतर तिचे पालक म्हणून उभ्या करण्यात आलेल्या दांपत्याला किती रक्कम द्यावी लागणार याची माहिती संबंधित दलाल देतो. बऱ्याच वेळा ही रक्कम लाखाच्या घरात असते. त्यापकी ६० ते ७० हजार रुपये दलाल घेतो आणि उर्वरित रक्कम पालक म्हणून उपस्थित असणाऱ्याला दिली जाते.
लग्न ठरवित असतानाच नववधूला ३ ते ४ तोळ्याचे दागिने घालण्याची अट घालण्यात आलेली असते. मुलगी लग्न करून सासरी आल्यानंतर सासरची स्थिती बघून पंधरा दिवस ते पाच, सहा महिने कशीतरी नांदते. माहेरी भेटून येते म्हणून गेल्यानंतर ती परत येण्याची चिन्हे दुरापास्त बनलेली असतात. अशा हतबल झालेल्या कुटुंबांची व तरुणांची आíथक व मानसिक ओढाताण नववधू पळून गेल्याने होत असल्याने याची जाहीर वाच्यताही केली जात नाही. त्यामुळेच या संदर्भातील तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत नाहीत.
हिंगणगाव येथे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी दलाल व नववधू वंदना पप्पू लष्कर रा. करमाळा यांच्यासह तिच्या बनावट काका, मावशी या सहाजणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येउन तक्रारी द्याव्यात असे आवाहन केले असून या टोळीने आणखी किती जणांना फसविले आहे याचा तपास आरोपींकडे करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:15 am

Web Title: broker gang revealed who sell and buy girls
टॅग : Girls,Sangli
Next Stories
1 पत्नी हेमाचा जामीन नाकारला
2 गुन्ह्याशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे पोलिसांनी आठवडय़ात ताब्यात घ्यावीत
3 खा. गांधी यांच्यासह अर्बन बँकेच्या आजी-माजी ५६ संचालकांना नोटिसा
Just Now!
X